पालिकेच्या क्रीडा विभागाकडून जलतरण तलावांची पाहणी   

पुणे: महापालिकेच्या ३५ जलतरण तलावांपैकी २५ जलतरण तलाव सुरु असुन, उर्वरीत दहा जलतरण तलाव दुरुस्ती आणि तांत्रिक बाबींमुळे बंद आहेत. तसेच महापालिकेच्या क्रिडा विभागाने या जलतरण तलावांची पाहणी केली असुन, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
 
महापालिकेने शहराच्या विविध भागांत जलतरण तलाव उभे केले आहे. उन्हाळ्यात जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणार्‍यांची गर्दी वाढत असते, त्यामुळे या कालावधीत जलतरण तलाव हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. महापालिकेने उभे केलेल्या ३५ जलतरण तलावांपैकी दहा जलतरण तलाव विविध कारणांमुळे बंद आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवार पेठेत असलेले न. वि. गाडगीळ जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण झाले असुन, तो अद्याप सुरु झाला नाही. कात्रज येथील शंकरराव कदम क्रिडा संकुलातील जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे कामाची निविदा धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाकडून काढण्यात आली होती. हा जलतरण तलाव सुरु केला गेला आहे. 
 
शिवाजीनगर येथील आमदार शिवाजीराव भोसले जलतरण तलाव, येरवडा येथील केशवराव ढेरे जलतरण तलाव, पाषाण येथील भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जलतरण तलाव, औंध गाव येथील औंध जलतरण तलाव, हडपसर येथील खासदार विठ्ठलराव तुपे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव हे दुरुस्तीमुळे बंद आहेत. यामुळे या भागातील नागरीकांची गैरसोय होणार आहे. घोरपडी येथील नारायण तुकाराम कवडे पाटील जलतरण तलाव चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रीया पुर्ण झाली असुन अद्याप करारनामा न झाल्याने तो बंद आहे. सहकारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया झाली नाही, त्यामुळे तो बंद आहे. तर बावधन येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलाव व व्यायामशाळेचे मुल्यांकन झाले नाही, त्यामुळे पुढील प्रक्रीया पार पडलेली नाही.
 
शिवदर्शन येथील जलतरण तलाव व क्रीडा संकुलाच्या संदर्भात न्यायालयीन वाद आणि दुरुस्तीमुळे तो बंद ठेवण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व जलतरण तलावांचा आढावा घेण्यात आल्याची माहीती क्रीडा विभागाच्या प्रमुख किशोरी शिंदे यांनी दिली. पोहण्यास येणार्‍यांची सुरक्षितता, पाण्याची गुणवत्ता आदीसंदर्भात सुचना संबंधित जलतरण तलाव चालकांना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Related Articles